औरंगाबाद (दिव्य मराठी/प्रवीण ब्रह्मपूरकर) :
सरोगसीच्या माध्यमातून मातृत्वाच्या गर्भाशयाचा बाजार मांडला जात आहे. घर भाड्याने द्यावे, तसे गर्भाशय भाड्याने देऊन तीन ते चार वेळा मुलांना जन्म देण्याचा प्रकार म्हणजे मातृत्वाचाच छळ असल्याचे सडेतोड मत सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राणी बंग यांनी व्यक्त केले.
सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राणी बंग |
एमआयटी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमासाठी आल्या असताना त्यांनी सामाजिक विषयांवर ‘दिव्य मराठी’शी चर्चा केली. त्या म्हणाल्या, शाहरुख खानसारख्या अभिनेत्याने दोन मुले असतानाही सरोगसीतून मातृत्व भाड्याने घेतल्यामुळे चुकीचा संदेश गेला. मुंबई, दिल्लीसारख्या शहरांत सरोगसीचा बाजार सुरू आहे. भारतात त्यासाठी कुठलाही कायदा नाही केवळ गाइडलाइन आहेत. मात्र, त्या पाळल्या जातात की नाही याची यंत्रणा नाही. त्यामुळे चार-चार वेळा गर्भाशय भाड्याने घेऊन गर्भाशयाचा किळसवाणा बाजार मांडला जात असल्याची टीका त्यांनी केली. सरोगसीपेक्षा मुले दत्तक घेण्याचा पर्याय चांगला असून फक्त दत्तक प्रकिया सुलभ करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
वयात येणार्या मुला-मुलींना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. त्यामुळे इंटरनेट, ब्ल्यू फिल्मच्या माध्यमातून चुकीचे लैंगिक शिक्षण त्यांना मिळत आहे. परिणामी, अल्पवयीन मुली माता बनण्याचे प्रकार वाढत आहेत. वयात येतानाच्या समस्या, स्वप्नदोष, मुलींचे प्रश्न यावर चर्चाही घरात होत नाही. त्यामुळे लैंगिक शिक्षण देण्याची गरज आहे. त्यासाठी पालकांची शिबिरे व्हावीत. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून हे शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. चित्रपटांमध्ये दारू, सिगारेटला प्रतिष्ठा दिली जात असून ही बाब चुकीची असल्याचे मत व्यक्त करत बंग म्हणाल्या, गडचिरोलीसारख्या भागात दारूबंदी आहे. तेथे दारूचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र, जी काही थोडीफार दारू विक्री होते ती सरकार आणि प्रशासनाच्या अनास्थेमुळे होत आहे.
फेसबुकमुळे कनेक्टिव्हिटी हरवली
फेसबुकमुळे सध्या कनेक्टिव्हिटी हरवत चालली आहे. प्रत्येकाला त्याचे व्यसन लागल्यासारखी स्थिती आहे. फेसबुकवर युवा पिढी वेळ वाया घालवत आहे. फेसबुकपेक्षा ‘फेस द वर्ल्ड’ असा संदेश त्यांनी दिला. आज एकत्रित कुटुंबसंस्थेचा अस्त होत चालल्यामुळे त्याचे सामाजिक परिणाम जाणवत आहेत. तरुणांमध्ये घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढले आहे. तडजोड करण्यापेक्षा विवाह मोडीत काढण्याचे प्रकार वाढत असल्याचे बंग म्हणाल्या.