मुंबई(शर्मिला कलगुटकर/सकाळ वृत्तसेवा):जगातील इतर सर्व देशांच्या तुलनेत भारतात, त्यातही मुंबईत भाडोत्री मातृत्वासाठी द्यावी लागणारी किंमत ही सर्वात कमी आहे. त्यामुळे परदेशी जोडप्यांची वाढती मागणी आणि आस लक्षात घेऊन फलित झालेले बीज कुरियरने पाठविण्याची सुविधाही दलालांनी आता सुरू केली आहे! यापूर्वी डॉक्टर, गर्भाशय भाड्याने देणारी महिला आणि संबंधित जोडप्यांची चर्चा आणि त्यानंतर पैशाच्या देवाणघेवाणीसंदर्भातील विस्तृत करार केला जात असे. हा पायंडा मोडीत काढून आता कुरियरने आलेल्या बीजांचे रोपण तुलनेने कमी किमतीमध्ये या महिलांच्या भाड्याने घेतलेल्या गर्भाशयात केले जाते.
गरीब महिलेच्या गर्भाशयात बीज सोडल्यानंतर एकाऐवजी दोन, तीन वा चार बाळे राहिली, तर तिला रक्कम किती मिळणार, प्रसूतीच्या वेळी जर ती दगावली, तर तिच्या कुटुंबाचे, मुलांचे काय होणार, तिला विमाकवच मिळणार की नाही, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रत्यक्ष चर्चाच होत नसल्याने अनुत्तरित राहत आहेत.धारावी, दिंडोशी, मालाड, वांद्रे, बोरिवली, दहिसर, उल्हासनगर, मुंब्रा, कुर्ला अशा मुंबईच्या कानाकोपऱ्यातील गरीब महिला प्रत्येक आयव्ही केंद्राशी निगडित असणाऱ्या दलालांशी जोडलेल्या असतात. भारतातील जातीव्यवस्थेचा पगडा लक्षात घेता भाडोत्री मातेची जात-धर्म, भाषा, राहणी, उच्चार अशा प्रत्येक गोष्टींची सूक्ष्म नोंद घेऊन अशा महिलांची निवड करण्याकडे मुंबई, गुजरात, अहमदाबाद, दिल्ली अशा शहरांतील जोडप्यांचा कल असतो; मात्र परदेशी जोडप्यांचा असा अट्टहास नसतो. भारतातील सरोगसीसंदर्भातील कायदे आणि आर्थिक व्यवहार हा अन्य देशांच्या तुलनेत फारच लवचिक असल्याने मुंबईच्या झोपडपट्ट्यांमधील महिलांना त्यांची पहिली पसंती असते.
मुंबई सरोगसी या एजन्सीने भारतात येण्यासाठी वेळ नसणाऱ्या परदेशी मंडळींसाठी "रोटुंडा - क्रोशिपर सुविधा' सुरू केली आहे. ज्याद्वारे फलन झालेले बीज डीएएल इम्पोर्ट-एक्स्पोर्ट सुविधेच्या माध्यमातून मुंबई सरोगसीशी संबंधित असणाऱ्या फलन प्रयोगशाळेत चोवीस तासांच्या आत पाठविता येते. शुक्राणू आणि वीर्याचे हे नमुने एअरपोर्टवरील कोणत्याही "क्ष' किरणाच्या कक्षेत येणार नाहीत, याची संपूर्ण दक्षता घेतली जाते. जर ते या किरणांच्या संपर्कात आले, तर त्यातील बीजफलनांची शक्यता त्याचक्षणी संपुष्टात येते. कोणत्याही देशातील "क्लाएन्ट'कडून मुंबई सरोगसीच्या प्रयोगशाळेत हा "नमुना' आणण्याची किंमत पन्नास हजार ते एक लाख रुपयांच्या घरात असते. अधिकाधिक परदेशी जोडप्यांना आकर्षित करण्यासाठी ही पद्धती आता सर्रास रूढ होऊ लागली असली, तरीही वैद्यकक्षेत्रातील तज्ज्ञ त्यातील धोका स्पष्ट करतात.
वंध्यत्वनिवारणतज्ज्ञ डॉ. सुभद्र रेगे यांच्या मते, सरोगसी पद्धतीने बाळ हवे असणाऱ्या जोडप्याने प्रत्यक्ष वंध्यत्वनिवारण केंद्रात राहणे अत्यावश्यक असते. किमान पंधरा दिवसांचा काळ त्यासाठी बंधनकारक असतो. आवश्यक त्या वैद्यकीय चाचण्या, निर्दोष बीजाची निर्मिती आणि फलनासाठी लागणारी वैद्यकीय प्रक्रिया हे अत्यंत महत्त्वाचे टप्पे आहेत. कुरियर सेवेने आलेले हे "रेडिमेड' बीज भाडोत्री महिलेच्या गर्भाशयात सोडल्यानंतर जर ते दुर्बल असेल, तर त्यास तारण्यासाठी औषधांचा, इंजेक्शन्सचा मारा त्या महिलेच्या शरीरावर होतो, जे त्या महिलेच्या आरोग्यासाठी हिताचे नसते.
गर्भाशय भाड्याने देणाऱ्या महिलांना दशकभरापूर्वी असणारा भाव आता ओसरला आहे. यापूर्वी दोन ते तीन लाख रुपये देण्यात येत असत. आता तीच रक्कम 75 हजार ते एक लाख रुपयांच्या घरात आली आहे. गरोदर राहण्यापूर्वीपासून तिचा आहार, विश्रांती, औषधे यांच्याबाबत दक्ष असणारी आयव्ही केंद्रे प्रसूती झाल्यानंतर औषधांमुळे तिच्या शरीरावर होणाऱ्या परिणामांची तसूभरही काळजी घेत नाहीत. भारतात भाडोत्री मातृत्वास कायदेशीर मान्यता असली, तरीही त्याबद्दल इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चने वैद्यकीय नियमावली बनविली आहे. तिचे पालन होताना दिसत नाही.
आयव्हीएफमधील तज्ज्ञ डॉ. श्रेयस दोंडे म्हणतात, "मध्यमवर्गातील महिला आपल्या स्थिर-सुखी कुटुंबाची अडचण करून हे पवित्र कार्य करायला तयार होत नाहीत, अशा वेळी गरीब महिलांना पैसे मिळत असतील, तर त्यात कुणाचे काय जाते?
डॉ. दोंडेंसारखेच समर्थन या क्षेत्रातील अनेक तज्ज्ञमंडळी वारंवार करीत असतात. मुलासाठी गर्भाशय भाड्याने देणाऱ्या गरीब महिला सलग तीन ते चार वेळा या पद्धतीने मुलांना जन्म देतात, तेव्हा त्यांना ही जीवावरची जोखीम असते हे डॉक्टर का बरे सांगत नाहीत, असाही प्रश्न पडतो.
No comments:
Post a Comment