मातृत्व ही निसर्गाची देणगीच! स्वत:च्या बाळाची अनेक स्वप्ने लग्न झालेल्या जोडप्यांनी रंगविलेली असतात. पण जेव्हा आपण आई होऊ शकत नाही हे जेव्हा त्या स्त्रीच्या लक्षात येते तेव्हा त्या जोडप्याच्या भावविश्वाला धक्का बसतो. अशा वेळी अनेक पर्याय डोळ्यांसमोर येतात. यातील जरा खर्चिक पण सध्या लोकप्रिय होत असलेला पर्याय म्हणजे 'सरोगसी'चा.
सरोगसी अर्थात उसने मातृत्व. काही वर्षांपूर्वी भारतात या पर्यायाचा फारसा विचार केला जात नसे. मातृत्वासाठी बाहेरून स्त्रीबिज किंवा शुक्राणू घेण्यासारख्या वैद्यकीय उपचारांमध्ये ती गोष्ट जगाला समजण्याची शक्यता नगण्य असते. सरोगसी मात्र जगापासून लपून राहणे अवघड असते. त्यामुळे 'लोक काय म्हणतील' ही भीती वाटून जोडपी हा पर्याय टाळतात. परंतु अभिनेता आमिर खान आणि किरण राव या दांपत्याने आपल्या बाळासाठी तो स्वीकारल्यावर सरोगसीला भारतातही ग्लॅमर प्राप्त झाले आहे. त्यामुळे ज्यांना त्याचा खर्च परवडू शकतो अशी जोडपी सरोगसीचा पर्याय निवडू लागली आहेत.