Showing posts with label गुजरात. Show all posts
Showing posts with label गुजरात. Show all posts

चित्त्यांना जन्म देण्यासाठी बिबट्या ‘सरोगेट मदर’

अहमदाबाद (दिव्य मराठी नेटवर्क) - चित्त्यांच्या संख्येत वाढ करण्यासाठी गुजरात सरकारने ‘सरोगेट मदर’ पद्धतीचा अवलंब करण्याचे ठरवले आहे. चित्त्यांची पैदास करण्यासाठी मादी बिबट्यांचा सरोगेट मदर म्हणून वापर केला जाणार आहे. स्कॉटलंडचे डॉ. बिल रीची यांनी पंधरा वर्षांपूर्वी क्लोनिंगद्वारे डॉली मेंढी तयार केली होती. आता चित्त्यांची पैदास करण्यासाठीही त्यांची मदत घेतली जाणार आहे.
गुजरातेतील जुनागड येथील सक्करबाग प्राणिसंग्रहालयात तीन आफ्रिकन चित्ते आहेत. 2009 मध्ये सिंगापूरमधून तीन गीर सिंहांच्या बदल्यात  हे चित्ते आणले गेले. गुजरातचे मुख्य वनसंरक्षक प्रदीप खन्ना यांनी या योजनेसंबंधी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, ‘चित्ता हा स्वभावत:च लाजाळू प्राणी आहे. त्यामुळे मादी चित्त्याने प्राणिसंग्रहालयात गर्भधारणा करून पिलाला जन्म दिल्याची उदाहरणे फार कमी आहेत. कोणत्याही प्रकारे चित्त्यांच्या संख्येत वाढ करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या दिशेने वाटचाल करण्यासाठी आम्ही जगातील नामांकित तज्ज्ञांची मदत घेतली आहे. कृत्रिम गर्भधारणा आणि सरोगेसी हे दोन प्रयोग आम्ही राबवणार आहोत.’
 डॉ. रीची यांनी प्रथमच एखाद्या भारतीय प्रकल्पात रुची दाखवली असून काही दिवसांपूर्वी डॉ. रीची यांनी गुजरातचा दौरा केला. गुजरात सरकारतर्फे या प्रकल्पासाठी सुमारे 19 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.