मुंबई(सकाळ वृत्तसेवा): मूल न होऊ शकणाऱ्यांना गर्भाशय भाड्याने देऊन अपत्यसुख देण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे.
त्याखालोखाल गुजरात, आंध्र प्रदेश आणि दिल्लीचा क्रमांक लागत असल्याचे
सरोगसीसाठी (भाडोत्री मातृत्वासाठी) नोंदविण्यात आलेल्या अधिकृत नोंदणी संकेतस्थळांवरील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
सरोगसी फाईंडर, सरोगसी फॉर कपल, सरोगेट अ ब्लेसिंग, ड्रीम सरोगसी नावाच्या विविध संकेतस्थळांवर
भाड्याने गर्भाशय देण्यासाठी उत्सुक असणाऱ्या मुली, तसेच स्त्रियांची नोंदणी केली जाते.
जगातील विविध देश, तसेच या देशांतील विविध प्रदेशांतून स्त्रियांची नोंद
येथे होत असते. या संकेतस्थळांमध्ये भाडोत्री मातृत्वासाठी सर्वाधिक मागणी - पुरवठ्याचे सूत्र "सरोगसी फाईंडर' वर पूर्ण केले जाते. अफगाणिस्तानपासून
इस्राईलपर्यंत, भारतापासून लंडनपर्यंत प्रत्येक देशातल्या अपत्य
नसणाऱ्यांसाठी भाड्याने गर्भाशय देणाऱ्या स्त्रियांची
नोंद येथे केली जाते. येथे सरोगसीसाठी कार्यरत असणाऱ्या एजन्सी, तसेच रुग्णालयांचीही विस्तृत
माहिती देण्यात आली आहे. येथे भाडोत्री
मातृत्व हे केवळ विवाहित वा एकत्र राहणाऱ्या जोडप्यांसाठी नसून "सिंगल्स', विभिन्न लैंगिकता असणारे
स्त्री-पुरुष यांनाही या पद्धतीने बाळ घेता
येते.