नागपूर (केवल जीवनतारे/ सकाळ) : 'सरोगेट मदर' किंवा "तात्पुरती माता' हा प्रकार आपल्या मानसिकतेला न पटणारा असला, तरी या पाश्चात्त्य प्रकाराचे अनुकरण आपण करीत आहोत. दिल्ली, मुंबई, कोलकता आणि गुजरातमधील बड्या शहरांमध्ये या संकल्पनेला मान्यता मिळेल, असे संकेत आहेत. हे लोण आता नागपुरातही पोहोचले असून उपराजधानीत पहिली "सरोगेट मदर' पुढील सहा महिन्यांत येथील एका खासगी रुग्णालयात बाळाला जन्म देणार आहे.
अपत्यप्राप्तीसाठी अमेरिकेसह पाश्चात्त्य देशात "सरोगेट मदर' ही संकल्पना रूढ झाली आहे; परंतु आपल्या देशात ही संकल्पना अजूनही रुजली नसली तरी हे अनुकरण करण्यात आपण मागे नसल्याचे वास्तव आहे. एखाद्या व्यक्तीसाठी स्वतःच्या गर्भात वाढविलेले मूल जन्मानंतर त्यांना दिले जाते. अपत्यप्राप्तीसाठी अक्षम असलेल्या व्यक्तींना केवळ त्यांचे बाळ वाढवण्यासाठी आपला गर्भ देणारी माता म्हणजे "सरोगेट मदर' म्हणून ओळखली जाते. सरोगेट मदर ही बाळाची नैसर्गिक माता असू शकेल. किंवा कुणाचे फलित बीज तिच्या गर्भात रोपण केले जाऊ शकते. तात्पुरत्या माता या साधारणत: गरीब किंवा मध्यमवर्गीय असतात. काही महिला स्वतःला मूल असूनही सरोगेट होतात. तर काही महिला आर्थिक उत्पन्नासाठीही सरोगेट होतात आणि आता तर कायद्याचे बळही सरोगसीला मिळाले आहे, हे विशेष. लहान शहरापर्यंत सरोगसी संकल्पना रुजली नसली तरी गुजरातमधील आनंद जिल्ह्यामध्ये सरोगसी मदर मोठ्या प्रमाणात आहेत. सरोगसीकडे उत्पन्नाचे साधन म्हणून बघितले जाते हे विशेष. नागपुरातील हा पहिलाच प्रयत्न असल्याचा दावा खासगी रुग्णालयाच्या प्रमुखांनी केला आहे.