देशात सुरू होणार 50 मिनी पासपोर्ट केंद्रे

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पासपोर्ट सेवा प्रकल्पांतर्गत देशभरात 77 पासपोर्ट सेवा केंद्रे उभारली जात आहेत. यापैकी 50 केंद्रे कार्यान्वित झाली आहेत. उर्वरित केंद्रे या वर्षात सुरू होतील, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या गोटातून सांगण्यात आले. शिवाय, आणखी 50"मिनी पासपोर्ट सेवा केंद्रे' उभारण्याची योजनाही सरकारच्या विचाराधीन आहे. खासगी व सरकारी क्षेत्राच्या भागीदारीतून ही योजना साकारलेली आहे. यामुळे नागरिकांना विनासायास पासपोर्टची प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत होणार आहे.

महाराष्ट्रात मुंबईत तीन आणि गोवा, पुणे, नाशिक, नागपूर व ठाणे येथे प्रत्येकी एक पासपोर्ट सेवा केंद्र आहे. मुंबईतील दोन केंद्रे कार्यान्वित झाली आहेत, तर इतर विविध टप्प्यांत आहेत. पासपोर्ट काढण्यासाठी नागरिकांना परिश्रम पडतात. कागदपत्रांची पूर्तता करतानाही त्यांची दमछाक होते. त्यातून दलालांचे फावते. आता हे टाळणे शक्‍य होईल, असा दावा मंत्रालयाच्या गोटातून केला जात आहे. यासंबंधी माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले, की पूर्वीच्या तुलनेत आता ही प्रक्रिया खूपच सुलभ झाली आहे. जवळपास साठ टक्के पासपोर्ट पोलिसांच्या तपासणीपूर्वी जारी केले जातात. त्यांची पोलिस तपासणी नंतर केली जाते. पोलिस तपासणी हीच नागरिकांची मुख्य डोकेदुखी असते; परंतु जे नागरिक अर्जाबरोबरच त्यांच्या पोलिस ठाण्याचे "एसएचओ' किंवा ठाणेप्रमुखांचे अधिकृत पत्र घेऊन येतात, त्यांचे काम अग्रक्रमाने होते व त्यांना पासपोर्ट लवकर मिळतो. परंतु "तत्काळ' योजनेत पोलिस तपासणीखेरीज पासपोर्ट एका आठवड्यात मिळतो. त्यानंतर पोलिस तपासणी केली जाते. सध्या या योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.
पासपोर्ट, व्हिसासंबंधी परदेशातील भारतीयांना मदत देण्याबाबत मंत्रालयाने विविध पावले उचलली आहेत. परंतु अलीकडच्या काळात परदेशी जोडप्यांकडून भारतात "सरोगसी'चे वाढते प्रकार घडू लागले आहेत. परदेशी जोडपी भारतीय मातांच्या माध्यमातून अपत्यप्राप्ती करून घेण्याचा हा प्रकार आहे. या संदर्भात नवनवे वाद निर्माण होत असल्याकडे लक्ष वेधले असता या अधिकाऱ्यांनी सांगितले, की अद्याप याबाबत नेमका व अचूक असा कायदा नसल्याने बऱ्याच अडचणी निर्माण होत आहेत.

भारतात अपत्य जन्माला आल्यानंतर त्याला ओळख प्रमाणपत्र देण्याचे कायदेशीर बंधन प्रशासनावर असते. ते दिलेही जाते; परंतु त्यानंतर संबंधित परदेशी जोडप्याने ते अपत्य स्वीकारणे किंवा संबंधित देशाने त्या मुलाला व्हिसा म्हणजेच त्या देशात प्रवेश देणे व स्वाभाविकपणे संबंधित देशाचे नागरिकत्व त्या अपत्याला मिळावे यासंबंधीचे नेमके नियम अद्याप अस्तित्वात नाहीत. यातूनच अनेक समस्या व कटकटी निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे परदेशी जोडपी पर्यटक व्हिसा घेऊन येतात आणि या गोष्टी करून जातात. या समस्येवर तोडगा काढण्याबाबत विचार सुरू आहे.

2 comments:

  1. Urgent need Female for (egg donation) /(kidney donors) with the sum of $500,000.00,whatsapp +91 9945317569
    Email: jainhospitalcare@gmail.com

    ReplyDelete
  2. Amazing content, a lot of amazing websites which is actually new for me.find surrogate mother

    ReplyDelete