मला आई व्हायचंय...?

महाराष्ट्रात ११ फेब्रुवारी, २०११ रोजी 'मला आई व्हायचंय' हा थोडासा गंभीर आणि संवेदनशील विषय असलेला चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाची उत्सुकता खूपच ताणली गेली होती. कारणही तसेच होते. हा पहिला अमेरिकन-मराठी चित्रपट आहे. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासाठी या चित्रपटाच्या विशेष खेळाचे आयोजन करण्यात आले होते. मग काय संपूर्ण अमेरिकेत 'मला आई व्हायचंय'चा बोलबाला झाला. पण या बोलबाला मागची कारणं थोडी चिवित्र वाटतात. जसं की...

...आर्थिक गरज भागवण्यासाठी
अमेरिका आणि ग्रेट ब्रिटनमधील सरोगसीचा खर्च भारतातील खर्चाच्या कितीतरी पटीने अधिक आहे. भारतात सरोगसीसाठी १२ हजार डॉलर (भारतीय मूल्य : अंदाजे `६ लाख) खर्च येतो. तर अमेरिका आणि ग्रेट ब्रिटनमध्ये यासाठी सुमारे ७० हजार डॉलर (भारतीय मूल्य : अंदाजे `३५ लाख) मोजावे लागतात. त्यामुळे अनेक विदेशी दाम्पत्य सरोगेट मदरच्या शोधात भारतात येत आहेत. भारतातील काही गरजू महिलाही आपली आर्थिक गरज भागवण्यासाठी सर्रास सरोगेट मदरसाठी तयार होत आहेत. गुजरातमधील आनंद जिल्ह्यातील महिला मोठ्या संख्येने सरोगेट मदरच्या व्यवसायात उतरल्याचे दिसून येत आहे. साधारण एका महिन्याभरात सुमारे ३० ते ४० विदेशी दाम्पत्ये सरोगेट मदरच्या शोधार्थ गुजरातमध्ये दाखल होत असल्याचे वृत्तपत्रांमधील बातम्यांमधून कळते.
संदर्भ: http://www.indiaprwire.com/pressrelease/education/2008082412343.htm

...सरोगेट मदर होण्यासाठी
गुजरातमधील आनंद जिल्हा दुग्धजन्य उत्पादनासाठी भारतात बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे. मात्र, आता आनंद जिल्ह्याची कीर्ती जगभर पसरली आहे, पण ती एका वेगळ्या कारणामुळेच. येथील बऱ्याच महिलांनी विदेशी दाम्पत्यांसाठी सरोगेट मदर होण्याचा पर्याय स्वीकारला आहे. यातून त्यांची आर्थिक गरज पूर्ण होत असल्याचे म्हटले जात आहे. त्याचबरोबर हे विदेशी लोक या महिलांच्या मुलांचा शिक्षणाचा संपूर्ण खर्च करण्यासही तयार होत असल्याने आनंद जिल्ह्यातील महिला सरोगेट मदर होण्यासाठी रांगेत आहेत.
संदर्भ: http://www.hinduonnet.com/2006/03/02/stories/2006030201872400.htm

...सरोगेट मदरच्या कारखान्यासाठी
अमेरिका, ग्रेट ब्रिटन आणि इतर प्रगत देशांमध्ये सरोगसीबाबत कडक कायदे करण्यात आले आहेत. तसेच या देशांमध्ये या तंत्रज्ञानाचा खर्चही खूप आहे. त्यामुळे अशा प्रगत देशातील मूल होण्यासाठी इच्छुक असलेली दाम्पत्ये मोठ्या संख्येने भारतात येत आहेत. भारतात अजूनतरी याबाबत कायदा करण्यात आलेला नाही. तसेच इतर देशांच्या तुलनेत भारतात खूपच कमी खर्चात ही प्रक्रिया होते. तसेच येथील सरोगेट मदरला ही जादा पैसे द्यावे लागत नाहीत. पैशांच्या आशेने येथील महिलाही (सुशिक्षित/अशिक्षित दोन्ही) सरोगेट मदरकडे एक व्यवसाय म्हणून पाहू लागल्या आहेत. त्यामुळे जागतिक पातळीवर भारताला 'सरोगेट मदर'चा कारखाना म्हटले जात आहे.
संदर्भ: http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/7661127.stm

सरोगसी आणि विविध देशातील कायदे-नियम

ऑस्ट्रेलिया : येथे सरोगेट मदर या वैज्ञानिक संकल्पनेला मान्यता आहे. परंतु, व्यावसायिक सरोगसीला कायद्याने बंदी आहे. तेथे याला गुन्हा म्हणण्यात आले आहे. मात्र, अजून याबाबत कायदा करण्यात आलेला नाही.

क्विन्स्लंड (ऑस्ट्रेलिया) : येथे परोपकारी किंवा नि:स्वार्थी भावनेने केलेल्या सरोगसी प्रकाराला मान्यता देण्यात आली आहे. त्याबाबत क्विन्स्लंड राज्याने १ जून, २०१० मध्ये 'सरोगसी ऑक्ट २०१०' असा कायदा केला आहे. मात्र, या कायद्याने व्यावसायिक सरोगसी बेकायदा ठरवला आहे.

कॅनडा : 'असिस्टेड ह्युमन रीप्रोडक्शन ऑक्ट' अंतर्गत कॅनडामध्ये २००४ पासून व्यावसायिक सरोगसी निषिद्ध मानण्यात आली आहे. असे करताना कोणी आढळल्यास सबंधिताला ५ लाख डॉलरचा दंड (भारतीय मूल्य : अंदाजे २ कोटी ५० लाख रुपये) किंवा १० वर्षांची कैद होऊ शकते.

फ्रान्स : १९९४ पासून फ्रान्समध्ये नागरी कायद्यानुसार परोपकारी/नि:स्वार्थी भावनेने किंवा व्यावसायिकरित्या केलेल्या सरोगसीला बेकायदा कृत्य असे म्हणण्यात आले आहे.

जॉर्जिया : येथे १९९७ मध्ये बीजरोपण, शुक्राणू बँक आणि सरोगसी आदी प्रकारांना कायद्याने मान्यता दिली आहे. शुक्राणू देणाऱ्या व्यक्तीला किंवा सरोगेट मदरला मूल जन्मल्यानंतर त्यावर हक्क दाखविण्याचा अधिकार नाही, असे कायद्यात नमूद करण्यात आले आहे. जोर्जीयामध्ये सरोगेट मदरला ९ हजार युरोपेक्षा (भारतीय मूल्य : अंदाजे ५ लाख ४९ हजार रुपये) अधिक मोबदला घेता येत नाही.

हॉंगकॉंग, हंगेरी, इटली, जपान आणि अमेरिकेतील काही राज्यात व्यावसायिक सरोगसीवर कायद्याने बंदी आहे.

भारतात २००२ पासून आणि ग्रेट ब्रिटनमध्ये २००९ पासून व्यावसायिक सरोगसीला कायद्याने मान्यता दिली आहे.



आशिया खंडातील ३८ देशांमध्ये सरोगसीबाबत कायदा किंवा धोरण नाही. भारतात व्यावसायिक सरोगसीला मान्यता आहे.
इस्राईलमध्ये व्यावसायिक सरोगसी निषिद्ध. जपानमध्ये सरोगसीला मान्यता नाही. चीन, सिंगापूर, तुर्की, तैवान आणि व्हियेतनाममध्ये सरोगसी निषिद्ध आहे.

आफ्रिका खंडातील ५० देशांमध्ये सरोगसीबाबत कायदा किंवा धोरण नाही. तर बेनीन आणि ट्युनिशिया या दोन देशांमध्ये सरोगसी निषिद्ध आहे.

युरोपमधील २४ देशांमध्ये सरोगसीबाबत कायदा किंवा धोरण नाही. ऑस्ट्रिया, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, नॉर्वे, पोलंड, सोल्वेनिया, स्वीत्झर्लंड, स्वीडन आणि ल्याटविआ या देशांमध्ये सरोगसी निषिद्ध आहे. डेन्मार्क, ग्रीस आणि नेदरलंडमध्ये व्यावसायिक सरोगसी निषिद्ध आहे. तर रशिया, युनायटेड किंगडम आणि युक्रेनमध्ये व्यावसायिक सरोगसीला मान्यता आहे.

दक्षिण अमेरिकेतील सर्वच्या सर्व म्हणजे ३३ देशांमध्ये सरोगसीबाबत कायदा किंवा धोरण नाही.

उत्तर अमेरिकेतील कॅनडामध्ये व्यावसायिक सरोगसीला मान्यता आहे. तर युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिकामध्ये असे धोरण किंवा कायदा नाही.

ऑस्ट्रेलिया खंडातील ३१ देशांमध्ये सरोगसीबाबत कायदा किंवा धोरण नाही. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये व्यावसायिक सरोगसी निषिद्ध आहे.
संदर्भ:www.kaylegalsurrogacy.com

इंटरनेट, भारत आणि सरोगसी

इंटरनेटवर सहज सर्फिंग करताना 'सरोगसी' किंवा 'सरोगेट मदर इन इंडिया' असा शब्द टाईप केला असता काही सेकंदात सुमारे ६७ हजार ८०० वेबसाईची पाने आपल्या समोर येतात. त्यातील काही पाने काळजीपूर्वक वाचली असता असे दिसून येते की, भारत हा खरोखरच 'सरोगेट मदर'चा कारखानाच आहे. या वेबसाईटद्वारे पाश्चात्य दाम्पत्यांनी 'सरोगेट मदर' साठी भारतात यावे यासाठी त्यांना आकर्षित करणाऱ्या विविध सवलती, कायद्यात्मकदृष्ट्या काहीच अडचण नाही, अशा आशयाच्या जाहिराती केल्याचे दिसून येते.

उदाहरणादाखल www.delhi-ivf.com हे संकेतस्थळ पहिले असता यावर सरोगसी इन इंडिया या मजकुरासोबतच रेन्ट अ वोम्ब (गर्भाशय भाड्याने द्यायचे आहे) असे मथळे दिसतात. त्याचबरोबर भारतातच सरोगसी का करावी? भारतात सरोगसी केल्यास त्याचे फायदे काय? येथे सरोगासीचा खर्च फक्त १२ हजार अमेरिकन डॉलर (`५ लाख ४० हजार) तर तोच खर्च अमेरिका आणि इंग्लंडमध्ये ७० हजार अमेरिकन डॉलर (`३१ लाख ५० हजार) आहे. अमेरिका आणि इंग्लंडमध्ये सरोगसीसंदर्भात कायदे आहेत. तसे भारतात कायद्यात्मकदृष्ट्या काहीच बंधने नाहीत. अशा जाहिरातींद्वारे पाश्चात्य दाम्पत्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 'सरोगेट मदर'च्या शोधात परदेशातून येणाऱ्या परदेशी लोकांसाठी भारतात २/३/५ स्टार हॉटेलांमध्ये बुकिंगची सोयही उपलब्ध करून दिले जात आहे. त्याचबरोबर त्यांच्यासाठी योग, तणावमुक्तीचे वेगवेगळे प्रकार आणि स्पा आदींची सोय उपलब्ध करून दिले जात आहे.

www.ivfcharotar.com (आकांक्षा इन्फर्टीलिटी क्लिनिक) या संकेतस्थळावर सरोगसीसंदर्भातील माहिती फ्रेंच, जर्मन, स्पानिश आणि जापनीज या भाषेतून दिली आहे. येथे सरोगेट मदरसाठी तुम्ही तुमची ट्रीप कशाप्रकारे अरेंज करू शकता याची इत्यंभूत माहिती येथे दिली आहे. तसेच लॉजिंग-बोर्डिंग, रिसोर्ट आणि स्पाची माहितीही दिली आहे.

www.findsurrogatemother.com या संकेतस्थळावर तुम्हाला कोणत्या देशात जाऊन सरोगासीची ट्रीटमेंट घ्यायची आहे किंवा सरोगेट मदर शोधायची आहे, याची माहिती दिली आहे. यात आर्मेनिया, जॉर्जिया, ग्रीस, भारत, युक्रेन आणि अमेरिका या देशातील सरोगसी सेंटर्स आणि क्लिनिक्सची माहिती दिली आहे. भारतातील दिल्ली, आनंद (गुजरात) आणि मुंबई या शहरातील सेंटरची माहिती दिली आहे.

www.ivfsurrogacycentre.com या संकेतस्थळावर तर बेधडकपणे असे म्हटले आहे की, सरोगसीच्या फक्त ट्रीटमेंटसाठी युके आणि अमेरिकेत जेवढा खर्च येतो तेवढ्या खर्चात भारतात तर तुमची संपूर्ण ट्रीटमेंट तर होतेच पण त्याचबरोबर तुमचे पर्यटन मनोरंजन होऊनही तुमचे बरेचसे पैसे वाचतील. आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे या सर्व प्रकीयेसाठी तुम्हाला भारतात बरेच दिवस राहण्याची गरज नाही. हे सर्व त्यांच्याच भाषेत सांगायचे तर - Treatment in USA /UK = Treatment in India + Tourising + Saving - Waiting Time. अशा जाहिरातीसोबत, भारतात सरोगसीसाठी जेमतेम २० ते ३० हजार डॉलर (`९ ते साडे तेरा लाख) खर्च येतो. पण पाश्चात्य देशात यासाठी सुमारे १ लाख २० हजार डॉलर (`५४ लाख) खर्च करावे लागतात. त्यामुळे ही ट्रीटमेंट आर्थिकदृष्ट्या भारतातच करणे कसे योग्य आहे हे सांगितले जात आहे. आर्थिक बाजूबरोबरच भारतात कायद्याच्याबाबतीतही काहीच अडचणी नाहीत, कारण अद्याप येथे तसा कायदाच नाही. सरोगेट मदर होण्यासाठी येथे मोठ्या संख्येने तरुणी उपलब्ध असल्याने आपल्याला निवड करण्याचीही सोय उपलब्ध आहे.
या अशा जाहिरातींमधील सर्वात धोकादायक बाब म्हणजे या क्लिनिकवाल्यांनी सरोगेट मदरचा धंदाच सुरु केला आहे. एका सरोगेट मदरची निवड केल्यास त्यासाठी १२ लाख रुपये द्यावे लागतील. परंतु, जर तुम्ही दोन सरोगेट मदरची निवड केल्यास तुम्हाला फक्त १६ लाख रुपये भरावे लागतील, अशाप्रकारच्याही जाहीराती या संकेतस्थळांवर दिसतात.

www.medicaltourismco.com या मेडिकल टुरिझम कंपनीने भारतात अत्यंत कमी खर्चात सरोगेट मदर किंवा सरोगसीची ट्रीटमेंट करून मिळते, अशी जाहीरात केली आहे. त्यासाठी त्यांनी २२ ते ३५ हजार युएस डॉलरचे (`१० ते पावणे पंधरा लाख) प्याकेजही जाहीर केले आहे. त्यात त्यांनी डॉक्टरची फी, वकिलाची फी, सरोगेट मदर शोधण्यासाठी लागणाऱ्या प्रकियेचा खर्च, नवजात बाळाच्या ट्रीटमेंटचा खर्च, सरोगेट मदरला द्यावा लागणारा मोबदला, स्त्री बिजांड/शुक्राणू देणाऱ्या संस्थेचा/घटकाचा मोबदला, औषधे आणि आयव्हीएफ तंत्रज्ञानावर खर्च असा सर्व गोष्टींचा समावेश केला आहे.

सरोगसी आणि वास्तव

आई होणे हा स्त्रिच्या आयुष्यातील अविभाज्य आणि महत्त्वाचा टप्पा मानला जातो. मात्र, काही अपरिहार्य कारणांमुळे मातृत्वाचा आनंद न घेता येणाऱ्या असंख्य स्त्रियांच्या आणि मूल होण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या जोडप्यांच्या आयुष्यातील जणू काही उत्साहच निघून गेल्याचे दिसून येते. त्यातील काही पालकांनी मूल घेतल्याचे आपण पाहतो. ज्यांना दत्तक मूल घ्यायचे नाही, अशा जोडप्यांसाठी विज्ञानाने एक क्रांतिकारक पाऊल टाकत टेस्टटूयूब बेबीचा पर्याय वापरून त्यांना स्वत:चे मूल मिळवून दिले.
टेस्टट्यूब बेबी, शास्त्रीय परिभाषेत याला 'आयव्हीएफ-इन-व्हिट्रो फर्टीलायझेशन ' असे म्हटले जाते. या प्रक्रियेत पत्नीचे बिजांड आणि पतीचे शुक्राणू यांचे शरीराबाहेर फलन करून या फलित बीजाचे पत्नीच्या गर्भाशयात पुन्हा रोपण केले जाते. काही स्त्रियांमध्ये बीजांडे तयार करण्याची क्षमता असते. परंतु, बिजांड वाहून गर्भाशयापर्यंत आणणाऱ्या नालीकांमध्ये दोष असल्यास आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. मात्र, एखाद्या स्त्रिच्या गर्भाशयाची नऊ महिने गर्भ वाढविण्याची क्षमता नसते. तेव्हा टेस्टट्यूब बेबीचा पर्याय उपयोगाच ठरत नाही.

सरोगसी म्हणजे काय?
या परिस्थितीवर मत करत आता विज्ञानाने 'सरोगसी'चा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. अपत्यहीन दाम्पत्यांप्रमाणे समलिंगी संबंध ठेवणाऱ्या 'गे' दाम्पत्यांनाही या पर्यायाने स्वत:चे मूल होऊ देण्याचा मार्ग सापडला आहे.
सरोगसी किंवा सरोगेट हा शब्द लॅटिनमधील 'सरोगेटस' या शब्दावरून घेण्यात आला आहे. त्याचा अर्थ 'सब्टीट्यूट' म्हणजेच 'पर्याय' असा आहे. जी स्त्री दुसऱ्याचे मूल आपल्या गर्भाशयात वाढविते, त्या महिलेला 'सरोगेट मदर' असे म्हटले जाते. तर या संकल्पनेला 'सरोगसी' असे म्हटले जाते. 'सरोगेट मदर' ही संकल्पना पाश्चात्य देशांबरोबर भारतातही चांगल्याप्रकारे रुजू लागली आहे.
गर्भाशयाची गर्भ नऊ महिने वाढविण्याची क्षमता नसल्यास त्या स्त्रीचे बिजांड शरीराबाहेर काढून त्याचे शुक्रजनतूशी फलित क्ररुन हे फलित बिजांड सक्षम गर्भाशय असलेल्या स्त्रिच्या (सरोगेट मदरच्या) गर्भाशयामध्ये ठेवले जाते. त्याचे रोपण होते आणि नऊ महिन्यानंतर मुलाचा जन्म होतो. या मुलामध्ये सरोगेट मदरची कोणतीही गुणसूत्रे नसतात. त्याच्यात जेनेटिक आई-वडिलांचीच गुणसूत्रे असतात.

सरोगसीच्या पद्धती
ट्रेडीशनल : या पद्धतीत सरोगेट मदर ही स्वत:च होणाऱ्या अपत्याची बायोलोजिकल माता असते. अपत्य हवे असलेल्या दाम्पत्यातील पतीच्या शुक्राणूच्या संयोगाने गर्भधारणा होते. लैंगिक संबंध व शुक्रणूच्या कृत्रिम रोपणातून (आर्टीफिशियल इनसेमिनेशन)च्या माध्यमातून अशी गर्भधारणा होते.
जेस्टेशनल : या पद्धतीत सरोगेट मदर ही होणाऱ्या अपत्याची बायोलोजीकाल (नैसर्गिक) माता नसते. स्त्री बीज व शुक्राणूंचा शरीराबाहेर संयोग घडवून असे बिजांड सरोगेट मदरच्या गर्भाशयात रुजविण्यात येतात.

व्यावसायिक सरोगसी म्हणजे काय?
व्यावसायिक सरोगसी म्हणजे ठरावीक करार करून सरोगेट मदरची भूमिका पार पडणाऱ्या महिलेला दुसऱ्याचे मूल आपल्या गर्भाशयात वाढविण्याचा मोबदला म्हणून रक्कम दिली जाते.
व्यावसायिक स्रोगासिला भारतात मान्यता आहे का?
२००२ पासून व्यावसायिक सरोगसी हा प्रकार भारतात अधिकृत मानला गेला आहे. व्यावसायिक सरोगसी या संकल्पनेतून जन्माला आलेल्या बेबी मानजी यमडा या मुलीच्या जन्मानंतर व्यावसायिक सरोगसीबद्दल भारतात मोठ्या प्रमाणावर चर्चा होऊ लागली.

'सरोगसी'संदर्भात प्रस्तावित विधेयक
'सरोगेट मदर' या प्रगत तंत्रज्ञानाचा दुरुपयोग होऊ नये आणि त्यावर प्रशासनाचे नियंत्रण असावे यासाठी २००८ मध्ये 'इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च'चे डॉ. आर. एस. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली 'The Assisted Reproductive Technologies (Regulation) Bill' तयार करण्यात आले आहे. मात्र, अजून ते संसदेत मांडण्यात आलेले नाही. या मसुद्यातील काही महत्त्वाच्या तरतूदी खालीलप्रमाणे.

१. सरोगेट मदर होऊ इच्छित महिला विवाहित असावी.
२. तिचे वय २१ ते ३५ वयोगटातील असावे.
३. ती महिला मूल आपल्या गर्भाशयात वाढविण्यासाठी सक्षम आहे का? याची वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक.
४. सरोगेट मदर होऊ इच्छिणाऱ्या महिलेचे समुपदेशन आवश्यक.
५. सरोगेट मदरला स्वत:चे एकतरी मूल असावे आणि तिची प्रसूती नैसर्गिकरित्या झालेली असावी.
६. तीनपेक्षा अधिकवेळा सरोगेट मदर होता येणार नाही.
७. पतीच्या संमतीबरोबरच कुटुंबाचीही सहमती असावी.
८. सरोगेट मदर होऊ इच्छिणाऱ्या महिलेने 'असिस्टेड रिप्रोडक्टीव्ह टेक्नॉलॉजी' (ART) सेंटरमध्ये रीतसर पेशंट म्हणून मूळ नावाने आणि सध्या रहात असलेल्या पत्त्यासह नाव नोंदवणे आवश्यक.
९. बाळाचा जन्म दाखला जेनेटिक पालकांच्या नावानुसारच तयार होणार.
१०. या प्रकियेत लिंगनिदान चाचणी करता येणार नाही; केल्यास तो कायदेशीर गुन्हा ठरेल.
११. गर्भधारणा ते प्रसूतीदरम्यानचा आणि बाळाशी संबंधित सर्व खर्च जेनेटिक पालकांना करावा लागणार.