गर्भाशय भाड्याने देण्यात महाराष्ट्र आघाडीवर

मुंबई(सकाळ वृत्तसेवा): मूल न होऊ शकणाऱ्यांना गर्भाशय भाड्याने देऊन अपत्यसुख देण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. त्याखालोखाल गुजरात, आंध्र प्रदेश आणि दिल्लीचा क्रमांक लागत असल्याचे सरोगसीसाठी (भाडोत्री मातृत्वासाठी) नोंदविण्यात आलेल्या अधिकृत नोंदणी संकेतस्थळांवरील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. 

सरोगसी फाईंडर, सरोगसी फॉर कपल, सरोगेट अ ब्लेसिंग, ड्रीम सरोगसी नावाच्या विविध संकेतस्थळांवर भाड्याने गर्भाशय देण्यासाठी उत्सुक असणाऱ्या मुली, तसेच स्त्रियांची नोंदणी केली जाते. जगातील विविध देश, तसेच या देशांतील विविध प्रदेशांतून स्त्रियांची नोंद येथे होत असते. या संकेतस्थळांमध्ये भाडोत्री मातृत्वासाठी सर्वाधिक मागणी - पुरवठ्याचे सूत्र "सरोगसी फाईंडर' वर पूर्ण केले जाते. अफगाणिस्तानपासून इस्राईलपर्यंत, भारतापासून लंडनपर्यंत प्रत्येक देशातल्या अपत्य नसणाऱ्यांसाठी भाड्याने गर्भाशय देणाऱ्या स्त्रियांची नोंद येथे केली जाते. येथे सरोगसीसाठी कार्यरत असणाऱ्या एजन्सी, तसेच रुग्णालयांचीही विस्तृत माहिती देण्यात आली आहे. येथे भाडोत्री मातृत्व हे केवळ विवाहित वा एकत्र राहणाऱ्या जोडप्यांसाठी नसून "सिंगल्स', विभिन्न लैंगिकता असणारे स्त्री-पुरुष यांनाही या पद्धतीने बाळ घेता येते. 
दिल्ली, गुजरात, आंध्र प्रदेश, तमिळनाडूसोबत महाराष्ट्रातल्या स्त्रियांची सर्वाधिक नोंदणी "सरोगेट फाईंडर' वर झालेली आहे. त्यात वय वर्षे 21 पासून 40 पर्यंतच्या स्त्रियांचा भरणा सर्वाधिक आहे. गर्भाशय भाड्याने का द्यायचे आहे, याची कारणे विशद करताना सर्वाधिक महिलांनी आर्थिक परिस्थिती हे सबळ कारण दिले आहे. यातील अनेकींनी स्वतःचे फोटोही बिनदिक्कत "लोड' केले आहेत. या माहितीची सत्यता तपासून पाहण्यासाठी येथे नोंदणी केल्यानंतर येणारा प्रतिसाददेखील एकदम "क्विक' असल्याचे "सकाळ'ला दिसून आले. भाडोत्री मातृत्वासाठी विविध प्रकारच्या ओळखपत्रांसोबत पासपोर्टची अट बंधनकारक आहे. गर्भाशय भाड्याने घेण्यासाठी इच्छुक असलेल्या अनेकांनी स्वतःच्या देशात येऊन मुलास जन्म द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. यात इस्राईल, बांगलादेश, लंडन आदी देशांतल्या इच्छुकांचा समावेश आहे.

वैद्यक क्षेत्रात भाडोत्री मातृत्वाच्या संकल्पनेच्या प्रत्यक्षीकरणास 2000 पासून जोर आला असल्याने, त्याच काळापासून या नोंदणीमध्ये राज्यातील महिलांची संख्या पूर्वीपेक्षा 25 टक्‍क्‍यांनी वधारल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. यात पूर्वी दोन ते तीन मुलांच्या मातांची संख्या होती. आता सोलापूर, पुणे, धुळे, सांगलीसारख्या भागांतील महिलांचे प्रमाणही अधिक आहे. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतल्या महिलांची संख्याही मोठी असून, आता गुजरात हेदेखील सरोगसीचे मुख्य केंद्र होऊ पाहते आहे.

ग्रामीण भागात गरिबी हे कारण 
वंध्यत्वनिवारण क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. रूपा मेहेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नोंदणीकृत संकेतस्थळावरून या महिला अनेक डॉक्‍टरांशी संपर्क साधतात. त्यांना मिळणारी रक्कम ही पूर्वीपेक्षा कमी होत असली तरीही अनेक जणी परिस्थितीअभावी त्यासाठी तयार होतात. घरखर्चाला हातभार लावणे, नोकरी नसल्याने या मार्गाने आर्थिक उत्पन्न मिळविणे, दुसऱ्याच्या भल्यासाठी हे काम करायला तयार होणे, अशी कारणे शहरी भागातील महिलांनी दिली असली तरीही राज्याच्या ग्रामीण भागातील मुलींनी गरिबी हे एकमेव कारण नोंदविलेले दिसते.

No comments:

Post a Comment