महाराष्ट्राच्या उपराजधानीतही 'सरोगेट मदर'

नागपूर (केवल जीवनतारे/ सकाळ) : 'सरोगेट मदर' किंवा "तात्पुरती माता' हा प्रकार आपल्या मानसिकतेला न पटणारा असला, तरी या पाश्‍चात्त्य प्रकाराचे अनुकरण आपण करीत आहोत. दिल्ली, मुंबई, कोलकता आणि गुजरातमधील बड्या शहरांमध्ये या संकल्पनेला मान्यता मिळेल, असे संकेत आहेत. हे लोण आता नागपुरातही पोहोचले असून उपराजधानीत पहिली "सरोगेट मदर' पुढील सहा महिन्यांत येथील एका खासगी रुग्णालयात बाळाला जन्म देणार आहे.

अपत्यप्राप्तीसाठी अमेरिकेसह पाश्‍चात्त्य देशात "सरोगेट मदर' ही संकल्पना रूढ झाली आहे; परंतु आपल्या देशात ही संकल्पना अजूनही रुजली नसली तरी हे अनुकरण करण्यात आपण मागे नसल्याचे वास्तव आहे. एखाद्या व्यक्तीसाठी स्वतःच्या गर्भात वाढविलेले मूल जन्मानंतर त्यांना दिले जाते. अपत्यप्राप्तीसाठी अक्षम असलेल्या व्यक्तींना केवळ त्यांचे बाळ वाढवण्यासाठी आपला गर्भ देणारी माता म्हणजे "सरोगेट मदर' म्हणून ओळखली जाते. सरोगेट मदर ही बाळाची नैसर्गिक माता असू शकेल. किंवा कुणाचे फलित बीज तिच्या गर्भात रोपण केले जाऊ शकते. तात्पुरत्या माता या साधारणत: गरीब किंवा मध्यमवर्गीय असतात. काही महिला स्वतःला मूल असूनही सरोगेट होतात. तर काही महिला आर्थिक उत्पन्नासाठीही सरोगेट होतात आणि आता तर कायद्याचे बळही सरोगसीला मिळाले आहे, हे विशेष. लहान शहरापर्यंत सरोगसी संकल्पना रुजली नसली तरी गुजरातमधील आनंद जिल्ह्यामध्ये सरोगसी मदर मोठ्या प्रमाणात आहेत. सरोगसीकडे उत्पन्नाचे साधन म्हणून बघितले जाते हे विशेष. नागपुरातील हा पहिलाच प्रयत्न असल्याचा दावा खासगी रुग्णालयाच्या प्रमुखांनी केला आहे.
नागपुरातील एका खासगी रुग्णालयात सरोगेट होणारी माता प्रामुख्याने नागपूरचीच आहे. ज्यांना या सरोगेट मदरकडून बाळ मिळणार आहे, ते दाम्पत्यही नागपूरचेच आहे. सध्या बारा आठवड्यांची "सरोगेट मदर' असून ती रुग्णालयात आहे. निपुत्रिक जोडप्यांसाठी हा योग आहे. नऊ महिन्यांनंतर ज्यांनी मातेला सरोगेट केलं ती माता हे बाळ या दाम्पत्याच्या स्वाधीन करेल.
सरोगेट मदरसाठी वेबसाइट्‌स सरोगेट मदर या विषयाला वाहिलेल्या अठरा लाखांवर वेबसाइट्‌स इंटरनेटवर उपलब्ध आहेत. यापैकी अनेक साइट या सरोगेट मदर पोहोचवणाऱ्या अथवा प्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत. या संदर्भातील वैद्यकीय आणि कायदेशीर माहितीही दिलेली आहे.

'भारतीय संस्कृतीत सरोगेट मदरचा विचार अजून रुजलेला नाही; परंतु काळानुसार विचारसरणीत बदल होत आहेत. "सरोगेट मदर' ही संकल्पना रूढ होत आहे. व्यापक अर्थाने या विषयावर विचार केल्यास निपुत्रिक जोडप्यांसाठी हे एक वरदान ठरू शकते. सध्या उपराजधानीतील हा पहिलाच प्रयत्न असावा; मात्र अपत्यप्राप्तीसाठी आसुसलेल्या जोडप्यांना अपत्यसुख देणारे हे पुण्यकर्म आहे.'
- डॉ. लक्ष्मी श्रीखंडे, प्रसिद्ध स्त्रीरोग व प्रसूतिरोगतज्ज्ञ, श्रीखंडे हॉस्पिटल ऍण्ड रिसर्च सेंटर, नागपूर

1 comment:

  1. Urgent need Female for (egg donation) /(kidney donors) with the sum of $500,000.00,whatsapp +91 9945317569
    Email: jainhospitalcare@gmail.com

    ReplyDelete